
Sunday, December 5, 2010
चळवळ-आंदोलनांच्या विद्यापीठाला लाल सलाम

Friday, August 21, 2009
रिपब्लिकन ऐक्यःएक मृगजळ

Thursday, August 13, 2009
`जनसुराज्य`ची अशीही चाल.....?

महाराष्ट्राच्या राजकीय परीघात, तेही अलिकडच्या काळात केवळ जात-धर्म किंवा केवळ एकच मुद्याचे राजकारण न करता, पुढे आलेला पक्ष कुठला असा प्रश्न पडु नये म्हणूनच काय, जनसुराज्यशक्ती पक्षाचा उदय झाला असावा. सुरवातीला केवळ एक कारखाना, , एक दुधसंघ, पुढे एक पंचायत समिती इथपर्यंत सत्ताकारणाची आस असणाऱ्या छोट्याश्या जनसुराज्यशक्तीने संघटनेने मारलेली मजल आता राज्याला दखल घ्यावी लागेल अशीच आहे. कोल्हापूर जिल्हा परिषद, जिल्हा मध्यवर्ती बँक, कोल्हापूर महापालिका, सांगली आणि सोलापूर महापालिकेत ताकद दाखवण्याचा प्रयत्न. यातूनच हा पक्ष आता विदर्भ-मराठवाड्यात आपले हात-पाय पसरू पाहत आहे. याचा अर्थ जनसुराज्यशक्तीची धाटणी एका विचारावर किंवा विशिष्ट मुल्यांवर झाली आहे, असे मानता येणार नाही. पण तसे भासवण्यात हा पक्ष आकारला आणणारे अपारंपारिक ऊर्जा मंत्री विनय कोरे यशस्वी झाले आहेत. हे मात्र मान्य करावे लागेल. स्वतः कोरे, हातकणंगलेचे आमदार राजीव आवळे, चंदगडचे आमदार नरसिंग गुरुनाथ पाटील आणि विदर्भातले मोर्शीचे आमदार हर्षवर्धन देशमुख....या चार आमदारांच्या बदल्यात जनसुराज्य पक्षानं एक मंत्रीपद मिळवलं. एका अर्थाने आता सत्तेत असलेला जनसुराज्यशक्ती पक्ष आघाडीधर्म म्हणून यापुढेही काँग्रेसशी सख्य ठेवेल, या शक्यता आता धूसर होऊ लागल्या आहेत. राष्ट्रवादीशी बिनसू नये, पण तितकीशी जवळीकही नाही, हे सूत्र मात्र कोरे यांनी पथ्य म्हणून घेतले आहे. त्यामुळेच त्यांची लोकसभा निवडणुकीतील भुमिका साईस्कर राजकारणी म्हणून वादग्रस्त ठरली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी असणारे मित्रत्वाचे संबंध किंवा मनसेचेच दक्षिण मुंबईतले उमेदवार बाळा नांदगावकर यांच्या प्रचार फेरीतला कोरेंचा सहभाग.....विनय कोरे नेहमीच चर्चेत आहेत. लोकसभा निवडणुकीत त्यांनी मराठवाड्यातल्या कॉंग्रेसच्या विरोधात उमेदवार उभे करुन आघाडी सराकरची नाराजी ओढावून घेतली होती. तर नांदगावकरांचा प्रचार केल्याबद्दल मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी कोरे यांचा कान धरला होता. पण `राज ठाकरे हे माझे चांगले मित्र आहेत....युती करण्याच्या गोष्टीनंतरच्या आहेत`...हे अगदी साच्याबद्ध उत्तर विनय कोरे सातत्यानं देत राहतात.आगामी विधानसभा निवडणुकीतही विनय कोरे राज्यातल्या जास्तीत जास्त जागांवर नशीब आजमावण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात ताकदीनं उतरण्याची घोषणा तर त्यांनी केलीच आहे, पण कोल्हापूर जिल्ह्यातल्या काही, मोक्याच्या जागांवर त्यांनी आतापासूनच आपला हक्क सांगायला सुरवात केलीय. पण त्यातही त्यांनी आपले-परके ही गणित नव्याने आखून घेतली आहेत.
आघाडीशी कोरे हातमिळवणी करतील, असं गृहीतक मांडलं तर आघाडीतल्या जागा वाटपात हा नवा वाटेकरही अडचणीचा ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळं आघाडीशी हात मिळवणी न करता जनसुराज्य शक्ती स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याची शक्यता अधिक आहे. कोल्हापुरात नुकताच पक्षाचा मेळावा झाला त्यात कोल्हापूर "उत्तर', "करवीर' या दोन्ही मतदारसंघांमध्ये आम्हाला प्रतिस्पर्धीच नाही, अशी दर्पोक्ती विनय कोरे यांनी केलीय. मूठभर उद्योजकांसाठी दरवर्षी हजारो कोटींची कर सवलत देणाऱ्या राज्यकर्त्यांनी शेतकऱ्यांना कधी नव्हे ते दिलेल्या कर्जमाफीची चर्चा करू नये, असे खडे बोल सुनावत त्यांनी आघाडी सरकारलाच घरचा आहेर दिलाय. अगदी राष्ट्रवादीनं देलेलं मंत्री पद म्हणजे मेहेरबानी नाही, असं म्हणत कोरे यांनी आघाडीला राम राम ठोकण्याचे संकेत जाहीर पणे दिले आहेत. पण ही घोषणाही गाजराच्या पुंगीसारखी आहे. कोल्हापूर उत्तर आणि करवीर बरोबरच चंदगड, शिरोळ, राधानगरी, हातकणंगलेत उमेदवार उभे करण्याची घोषणा त्यांनी केलीय. कोरे यांनी जिल्ह्यातील जवळजवळ सर्व जागा स्वबळावर लढविण्याचे संकेत दिलेत. कागल आणि कोल्हापूर-दक्षिणबाबत त्यांनी भुमिका जाहीर केली नाही, पण ते उघड-गुपित असेल, अशी अटकळ आहे. कागलचे आमदार म्हणजे नगरविकास राज्यमंत्री हसन मुश्रीफ हे कोरे यांचे महापालिका, जिल्हापरिषद आणि जिल्हा बँक या आघाड्यांमुळे निकटवर्तीय. त्यामुळे तेथे जनसुराज्य नसणार हे स्पष्ट आहे. कोल्हापूर दक्षिण मध्ये मात्र विनय कोरे यांनी शह-काटशहाचे धोरण स्विकारले आहे. महापालिकेच्या राजकारणात सतेज पाटील यांच्या विरोधात आघाडी उघडलेल्या कोरे यांनी आता मात्र महाडीक यांचा विरोधक तो आपला मित्र या नात्याने सतेज पाटील यांच्याशी हातमिळवणी केली आहे. त्याला निमित्त ठरले आहे, ते कोल्हापुरातील राजाराम सहकारी साखर कारखान्याची निवडणुकीचे...
मराठवाड्यात पक्षाची ताकद किती आहे...आघाडीला सोडचिठ्ठी देऊन हा पक्ष मनसेशी मन जुळवणार का....हे प्रश्न थोडे बाजुला ठेवले तरी कोल्हापुरातल्या लढतींमध्ये या पक्षाची भूमिका निर्णायक असणार असं दिसतंय. महापालिकेत या पक्षाची संयुक्त सत्ता आहे. महापौर उदय साळोखे जनसुराज्य शक्ती पक्षाचेच आहेत. जिल्ह्यातले तीन आमदार या पक्षाचे आहेत आणि गेल्या पाच वर्षांत जिल्ह्याच्या बाहेर पक्ष वाढीसाठी प्रयत्न कोरे यांनी जाणिवपूर्वक प्रयत्न केले आहेत. सांगली, सोलापूर, नांदेड या जिल्ह्यांमध्ये कोरे यांचे प्रयत्न विशेष फळाला आल्याचं दिसतंय. कोल्हापूर उत्तर मधून जनसुराज्यकडून तिकीट मिळावं यासाठी अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधलंय. करवीर मतदारसंघात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार पी. एन. पाटील यांना तगडा विरोधक देण्याचे आव्हान कोरे यांच्यासमोर आहे. इच्छूकांची संख्या कमी-जास्त होतेय, पण तगडा उमेदवार कोण असेल या वर जनसुराज्यमधल्या नेतृत्त्व कौशल्याची कसोटी लागेल. इकडं खुद्द विनय कोरे यांचा पन्हाळा मतदारसंघ आणि शाहूवाडीचे विद्यमान आमदार सत्यजित पाटील सरुडकर यांचा मतदारसंघ नव्या रचनेत एक झालाय. त्यामुळं कोरे आणि सरुडकर आमने-सामने येणार आहेत. तसंच शाहूवाडी तालुक्यातला गायकवाड गटही सक्रीय असल्यानं तिथली राजकीय गणितं रंगतदार आहेत.
एकूणात कोल्हापूर जिल्ह्यात जनसुराज्य मुळं चांगलीच चुरस निर्माण होणार असं दिसतंय. एकुणात कोल्हापूर जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या बुरूजालाच धक्का बसल्याने, या दोन्ही काँग्रेसना परिस्थितीचे भान येऊन, ते बळ निर्माण करणार का, की स्वबळाच्या भाषेतूनच बळ घालवणार आणि या सगळ्यात जनसुराज्यशक्ती नेहमीप्रमाणे कुठे जागा निर्माण करणार,हा येणारा काळच ठरवेल.
चांगभलं....
Tuesday, July 28, 2009
तिढा कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा
